बेळगाव : बेळगावच्या बीम्स संस्थेतील आणि इस्पितळातील गैरकारभाराबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या ३–४ दिवसांत बीम्सवर समर्थ आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली.
मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावातील सुवर्णसौधमध्ये आज कोविडसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी त्यांचे आज सकाळी सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच बीम्स इस्पितळाला भेट देऊन पाहणी केली आहे. यासंदर्भात आमची चर्चा झाली असून, येत्या ३-४ दिवसांत बीम्सवर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक पदी नेमणूक करून तेथील अव्यवस्था दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल.
साखर कारखान्यांना ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची बाकी रक्कम कारखान्यांनी द्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे सांगितले. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत ते म्हणाले, शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी परीक्षा रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. कोरोना परिस्थिती सुधारली तर परीक्षा घेऊ अन्यथा नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी अलीकडेच ‘आम्ही हात जोडून सांगतो, सर्वाना तातडीने कोरोना लस द्या’ असे म्हटले होते. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर केवळ ‘नमस्कार’ असे म्हणत मुख्यमंत्री माध्यमांच्या गराड्यातून निघून गेले.