महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध विभागात हा सण वेगवेगळ्या वेळी साजरा होतो. या सणाला बैलपोळा असेही म्हणतात. चंदगड तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात बेंदूर दोन वेळेस साजरा होतो. तालूक्याचा पूर्वेकडील किणी -कर्यात भागात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. आज महाराष्ट्रीय बेंदूर. चंदगड तालुक्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीक्षेत्राचा विचार करता बेंदूर म्हणजे खरीप हंगामातील कामांची सांगता.
दारात ट्रॅक्टर, पावर ट्रेलर अशी सगळी यंत्र हजर असतानाच्या या आधुनिक काळातही चर्चा सर्जा राजाचीच. माणूस आणि प्राणी यांच्यातील हे नात इथून पुढील काळातही आबाधित राहो हेच निसर्गाकडे मागणं.
तालुक्यात सगळ्यात जास्त घेतल जाणार पीक तांदळाच. तांदळाच्या पीठापासून बनवलेला उंड्यांचा खास बेत केवळ बैलांसाठी. याच उंड्यांची माळ बैंलाच्या गळ्यात बांधली जाते आणि नंतर त्या उंड्यांसोबत झणझणीत मटणाचा बेत घरातल्या सर्वांसाठी.
घरातल्या जाणत्या माणसांसाठी हा सण थोडा भावना प्रधान. वर्षभरात कधी ना कधी बैलाच्या पाठीवर एखादा तरी चाबूक ओढलेला असतोच. त्यासाठी माफी मागताना डोळ्यात पाणी नाही आल तर ते नवलच. बच्चे कंपनी एकदम खुष. बैलांची शिंग रंगवणे, त्यांच्यासाठी गोंडे तयार करणे, देव्हाऱ्यात पुजण्यासाठी मातीचे बैल अशी बरीच धमाल असते. सध्या विस्मरणात गेलेली अजून एक पद्धत म्हणजे नव्या जावयाला सासरवाडीकडून जेवणाच विशेष निमंत्रण असत. जावयाला घोंगड, छत्री, रेनकोट अशी भेट ही दिली जाते. शेती संस्कृतीमधील प्रत्येक सणाच आपल अस एक खास वैशिष्ट्य असत. बेंदरादिवशी दाराला पिंपळ पानांपासून घरीच तयार केलेल तोरण – ओळ्या बांधतात. असच तोरण सर्व शेती अवजारांना बांधतात.
गोंडा बैलांच्या गळ्यात बांधायचा कि शिंगाना बांधायचा याबाबतीत प्रत्येक गावच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. भावना मात्र एकच .. घरातील बैलजोडीच्या प्रती असणार प्रेम, माया आणि आपुलकी. घरातील ज्येष्ठ मंडळी बैलांच्या खुरांना हात लावून नमस्कार करतात आणि जन्मोजन्मीच हे नातं अखंड रहावे म्हणून प्रार्थना करतात.