

मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी अखेर ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ही अनोळखी महिला त्यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत होती. महिलेने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंगद्वारे संवाद साधला आणि त्यानंतर फोन करून मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील छायाचित्रे आमदारांना पाठविण्यास सुरुवात केली. यानंतर तिने धमकावणे सुरू केले.
मैत्री आणि अश्लील छायाचित्रांचा आधार घेत या महिलेने आमदाराकडे खंडणीची मागणी करण्यास सुरुवात केली. तिने कधी एक लाख, कधी दोन लाख, तर कधी पाच लाख रुपये अशा टप्प्याटप्प्याने एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली. आमदार पाटील यांनी जेव्हा या महिलेचा त्रास असह्य झाल्याने तिचा संपर्क ‘ब्लॉक’ केला, तेव्हा तिने उलट त्यांनाच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली.
दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. एका लोकप्रतिनिधीला लक्ष्य करून खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न असल्याने सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta