कोल्हापूर (एस. के. पाटील) : कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात
येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नियमबाह्यपणे कायद्याचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे दिलेल्या पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदांच्या मान्यता तात्काळ रद्द कराव्यात या प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण कोल्हापूर येथील विभागीय संचालक कार्यालयासमोर आज सुरू करण्यात आले. खाजगी बीएड नियुक्त माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक आज प्राणांकित उपोषणास बसले आहेत.
शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे -१ यांनी पारित केलेल्या सेवाज्येष्ठता मार्गदर्शन पत्रानुसार खाजगी शिक्षण संस्थांच्या सेवाज्येष्ठता यादी तयार करुन पदोन्नतीची प्रक्रिया व्हावी. तसेच इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्याच्या बी.एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघाने आज सोमवार दि. २४ जानेवारी २०२२ रोजी प्राणांतिक उपोषणास सुरूवात केली. राज्यातील खाजगी अनुदानित शिक्षणसंस्थांच्या माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदोन्नतीच्या पदावर प्रवर्ग ‘क’ मधील सेवाज्येष्ठतेनुसार सेवाज्येष्ठ माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करणे, सेवा शर्ती कायदा व नियमावलीस अनुसरुन आहे. पण तरीही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियमबाह्य, बेकायदेशीरपणे केलेल्या नियुक्त्या आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यता हा गेल्या काही वर्षातील वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेवरुन वाद निर्माण झाले आहेत. परिणामी शाळांमधील दैनंदिन कामकज, गुणवत्ता व शिस्त या बाबींवर दुरगामी परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. यावर कायमस्वरुपी मार्गदर्शन आणि निर्णयप्रणाली तयार होण्यासाठी सर्वोच्य न्यायालयातील अनेक न्यायनिवाडे, निर्णय तसेच शाळा सेवा शर्ती कायद्यातील तरतुदींचा साकल्याने विचार करुन राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे -१ यांनी माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येठता निर्धारीत करण्यासाठी मार्गदर्शनपर परिपत्रक राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षण उपसंचालकांना पाठविले आहे.
तरी या सेवाज्येठता मार्गदर्शन पत्राला तसेच कायदा, नियमावलीस डावलून पदोन्नतीमध्ये चुकीच्या नियुक्त्या आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या पदोन्नतीच्या मान्यता या गंभीर चूका आहेत. त्यामुळे दिलेल्या या पदोन्नती आणि मान्यता तात्काळ रद्द कराव्यात आणि दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबाजवणी करावी ही प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण आंदोलनाची आहे. या मागणी बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या सुसनावणीचा नियमबाह्य पध्दतीने दिलेला निर्णय तात्काळ रद्द करुन शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शन पत्रानुसार निर्णय देण्यात यावा. माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठतेबाबत शिक्षण संचालनालयाच्या दि. २२/११/२०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश विभागातील सर्वच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात यावेत. आदि मागण्या या प्राणांतिक उपोषण आंदोलनाच्या आहेत. बी. एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय गुरव, विजय तलबार, मधुकर कोकणी, रवींद्र खैरे, अनंतकुमार मोघे यांच्यासह सौ. अश्विनी कांबळे, मोहन कांबळे, जितेंद्र कांबळे, सुयोग कांबळे उपोषणास बसले आहेत तर चंदगड तालुक्यातून एस. डी. पाटील, एस. के. पाटील, एम. वाय. कांबळे, बी. बी. नाईक, एस. आर. निळकंठ आदि शिक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठींबा दिला. दरम्यान संघटनेचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव, संजय गुरव, एस. के. पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण सहसंचालक शुभाष चौगुले यांच्याशी चर्चा केली. पण ती निष्फळ ठरल्याने आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.