हलकर्णी (एस. के. पाटील) : तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना आजपासूनच सोडणार असे अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखाना स्थळावर सांगितले. दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आज सकाळपासून थकीत पगार आणि ग्रॅच्युटी मिळावी यासाठी गेटवर आंदोलनाला बसले आहेत. यामुळे जवळपास २-३ तास कारखान्यात जाणारा ऊस अडवण्यात आला. कारखाना मॅनेजमेंट आणि निवृत्त कर्मचारी यांच्यामध्ये चर्चेतून कोणताही मार्ग बाहेर पडला नाही. आज अचानकपणे अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखान्यात येऊन कारखाना बंद करणार अशी खंत व्यक्त केली.
हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्युट्रियंटस कंपनीने चालविण्यासाठी घेतला होता. परंतु, या कंपनीने करारातील अटी शर्तीप्रमाणे रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा केली नाही. त्यामुळे २१ डिसेंबर २०१८ ला बँकेने या साखर कारखान्याचा ताबा स्वतःकडे घेतला. त्यानंतर नवीन निविदा काढून हा साखर कारखाना अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेड या कंपनीकडे ३९ वर्षे कालावधीसाठी चालवायला दिला. तेव्हापासून अथर्वचे प्रशासन कारखाना चालवत असल्याचे दिसून येते. पण हा साखर कारखाना बंद पडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप कोणाचेही नाव न घेता मानसिंग खोराटे यानी केला. आज झालेल्या कामगारांच्या आंदोलनामुळे मानसिंग खोराटे कोल्हापूरहून कारखाना स्थळावर हजर झाले आणि कामगारांसमोर आपली भूमिका मांडली.
यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले की, अनेक अडचणीत असलेला दौलत साखर कारखाना आम्ही चालवायला घेतला आणि आजपर्यंत उत्कृष्टरित्या चालवत आहोत अशी शेतकऱ्यांनी पसंतीही दिली. पण तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याला दौलत कारखाना चालू अवस्थेत नको आहे म्हणून आम्ही कारखाना हातात घेतल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्रास देणे चालू ठेवले आहे. ते कोर्टात गेले. कधी एमएसईबी तर कधी पोलिसांना सांगून कारखाना बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. हिम्मत असेलतर समोर येऊन कारस्थाने करा असेही आव्हान खोराटे यांनी नाव न घेता दिले. आज आम्ही हा कारखाना या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून सोडत आहोत. त्यामुळे आजपासून कारखाना बंद करा आणि आपल्याकडे आलेल्या ऊसाच्या गाड्या इतरत्र पाठवा असेही खोराटे यांनी सूचना दिल्या. दरम्यान, अजूनही दौलत प्रशासक आणि निवृत्त कामगार यांच्यात चर्चा चालू असल्याचे समजते.
आमचे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून नसून आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात असल्याचे स्पष्टीकरण आंदोलक कामगार नेते एस. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
रात्री उशिरापर्यंत दौलत कारखान्यावर प्रचंड गोंधळ चालू होता. पोलिसानी दौलतवर बंदोबस्त वाढवला आहे.