सावधगिरीच्या उपाययोजना कायम
बंगळूर : कोविड-१९ प्रकरणांची सध्याची स्थिती आणि हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण विचारात घेऊन राज्य सरकारने उद्या (ता. ५) पासून जिम, योग केंद्र, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली, तेव्हा हे निर्बंध आणले गेले होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आरोग्य मंत्री सुधाकर, तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एम. के. सुदर्शन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर शिथिलता जाहीर करण्यात आली.
बैठकीनंतर प्रसार माध्यमाना माहिती देताना आरोग्य मंत्री सुधाकर म्हणाले, की जानेवारीमध्ये कोविड-१९ रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ५ टक्के होते, ते आता २ टक्क्यांवर आले आहे. निर्बंधांमुळे विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री बोम्मई यांनी आसन क्षमतेवरील निर्बंध शिथिल केले आहेत. तथापि, सावधगिरीचे उपाय अजूनही पाळले पाहिजेत.
यामध्ये सिनेमा हॉलमध्ये नेहमी मास्क घालणे अनिवार्य आहे. याची कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. हॉलमध्ये जेवण व पेय घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. मध्यंतरादरम्यान लोक हॉलच्या बाहेर जेवू शकतात. या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास राज्य कारवाईला आमंत्रित करेल. या व्यतिरिक्त, या जागांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोविड-१९ लसीच्या दोन डोससह पूर्णपणे लसीकरण केले पाहिजे.
सकारात्मकतेचा दर कमी होत आहे. तिसर्या लाटेमुळे जितक्या वेगाने प्रकरणामध्ये वाढ झाली, तितक्याच वेगाने ती कमी देखील होत आहे. निर्बंध मागे घेतल्याचा अर्थ असा नाही, की आपण आत्मसंतुष्ट होतो. या दोन वर्षांत आम्ही कोविडशी सामना करण्याचे धडे घेतले आहेत. आपण खबरदारी घेतली पाहिजे, असे सुधाकर पुढे म्हणाले.
इतर कार्यक्रमावरील निर्बंध कायम रहातील. खुल्या जागेतील कार्यक्रमात ३०० लोक व कार्यालयात २०० लोकांनाच भाग घेता येईल. धार्मिक उपासनेच्या ठिकाणी एका वेळी ५० लोक आणि जत्रा, रॅली, धरणे आणि निषेधांवर बंदी कायम राहील, असे सुधाकर यांनी सांगितले.
