संभाजी ब्रिगेडच्या गिरगाव कोव्हीड सेंटरमुळे रुग्णांमध्ये नवी ऊर्जा
कालकुंद्री (वार्ताहर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण, नेते, खेळाडू, शरीरसौष्ठवपटू, पैलवान (घाबरून?) बळी पडत असताना एका ८५ वर्षांच्या आजीने या धोकादायक कोरोनाला चितपट केलंय. हे आश्चर्य घडलंय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोल्हापूर नजीकच्या गिरगाव- पाचगाव सेंटरमध्ये. कोल्हापूर शहरातील सर्व रुग्णालये कोरोना रुग्णांनी ओसंडून वाहत असताना रुपेश पाटील यांनी ब्रिगेडचे सदस्य व परिसरातील तरुणांच्या सहकार्याने गिरगाव- पाचगाव येथील राजर्षी शाहू निवासी शाळेत १०० बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करून परिसरातील रुग्णांना फार मोठा आधार दिला आहे. याचे उद्घाटन खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी झाले होते. समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून येथील स्वयंसेवकांना सर्व सुरक्षा साधने, रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषधोपचार, पौष्टिक व संतुलित आहार पुरवला जात आहे. या सेंटरमधून रोज अनेक रुग्ण कोरोनावर मात करून बाहेर पडत आहेत. ही संभाजी ब्रिगेडसाठी समाधान व अभिमानास्पद बाब आहे. यावर कळस चढविला तो इंदुबाई गणपती पाटील या गिरगाव, ता. करवीर येथील ८५ वर्षांच्या आजीने! गंभीर अवस्थेत सेंटरमध्ये दाखल झालेल्या आजीने आपल्या जगण्याच्या जिद्दीमुळे कोरोनावर मात केली. आजीच्या कुटुंबातील पाचजण पॉझिटीव्ह होते. सर्वजण सुखरूप बरे झाले. आजी, मुलगा नारायण व सुन रेखा हे तिघे संभाजी ब्रिगेड कोव्हीड केअर सेंटरमधे दाखल झाले होते. मेडिटेशन, योगासने, व्यायाम यामधे आजी उत्साहाने सहभागी होत होत्या. घरच्या चवीचे जेवण, नैसर्गिक वातावरण, कार्यकर्त्यांनी केलेली सेवा यामुळे आजीने आपणास खुप आनंद, समाधान झाल्याचे सांगितले. संभाजी ब्रिगेडच्यावतीने त्यांचा कोल्हापूरी फेटा बांधून सन्मान केला. सेंटरवरील सर्व डॉक्टर, स्वयंसेवक व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञतेने हसतमुख निरोप घेतला. संभाजी ब्रिगेडने सुद्धा यावेळी रण हलगीच्या कडकडाट करून उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांमध्ये उत्साह निर्माण केला. तत्पर आणि निरपेक्ष सेवेमुळे लोकप्रिय ठरलेल्या या कोरोना सेंटरची धुरा वाहणाऱ्या रुपेश पाटील यांना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अहोरात्र झटून सहकार्य करत आहेत. बहुजनांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी वाहून घेतलेल्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कोव्हीब सेंटरने सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
