चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत झालेल्या युवकांची नावे आहेत. तवंदी येथे देवदर्शनासाठी जावून परतत असताना दोघांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. ९) अमावस्या असल्याने सिद्धार्थ खेमलापुरे आणि प्रमोद नाईक हे दोघेही आपल्या दुचाकीवरून निपाणीजवळील तवंदी येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना कब्बूर टोल गेटजवळ टोलची रक्कम भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला त्यांनी मागून जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक अशोक कुळूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद चिक्कोडी पोलिस स्थानकात झाली आहे.