सदलगा : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्यावतीने सदलग्यातील जनता बँकेच्या सभागृहात येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्टकेम टेक्नॉलॉजीच्या सहयोगाने ऊस पीक संगोपन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. प्रमुख वक्ते श्री. बिपिन चोरगे होते.
राहूल आवाडे, संचालक सुमेरु पाटील, कुमार बदनीकाई, बाळासाहेब पाटील, बिपीन चोरगे (स्मार्टकेम) बाबासाहेब चौगले (जवाहरचे उपाध्यक्ष), संचालक शीतल अम्मण्णावर, सुनिल नारे, किरण कांबळे, भास्कर पट्टणकुडे,नगराध्यक्ष अभिजीत पाटील, सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, पंचगंगा साखरचे माजी संचालक डी. एस. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राहूल आवाडे म्हणाले, जवाहर साखर कारखान्याच्या वतीने बिनव्याजी खते, रोपे ऊस उत्पादकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. माती परीक्षण, ऊस पानांचे परिक्षण सर्व सभासद शेतकऱ्यांना कारखान्याच्या कडून मोफत करून देण्यात येत आहे त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
ऊस गळीत हंगाम दिवसेंदिवस कमी कालावधीचा होत चालला आहे, ऊस तुटून गेल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर रान मोकळे करुन देऊन एखादे धान्य पीक घेता येईल का अशाप्रकारचे नियोजन करण्याचा प्रयत्न जवाहर कारखान्यांकडून होत असल्याची माहीती जवाहर कारखान्याचे केन कमीटी अध्यक्ष राहुल आवाडे यांनी दिली.
स्मार्टकेमचे बिपिन चोरगे म्हणाले, कमी खर्चात जास्ती उत्पादन याकडे शेतकऱ्यांचा कटाक्ष असावा, ऐंशी नव्वद टन ऊस उत्पादन हे प्रत्येक शेतकऱ्यांना पुरेसे आहे, चांगले उत्पादन आहे असे प्रतिपादन चोरगे यांनी केले. उसाची मुळ्या सुटून उगवण होऊन पाने फुटल्या नंतरच दिलेली खतमात्रा नेमक्या ऊस पिकाला मिळते अन्यथा दिलेली खतमात्रा एक तर वाया जाते किंवा तण वाढण्यास कारणीभूत ठरते.
पाणी नियोजनासंदर्भात माहिती देताना उसाला पाण्यात पाणी सातत्याने न देता, आवश्यकता बघूनच पाणी दिले पाहिजे, मातीमध्ये वाफसा जोपासणे महत्वाचे आहे. दोन ऊसाच्यामध्ये वरंब्यावर एक फूट खालील मातीत जर पाणी असेल, माती ओली असेल तर त्या ऊस पिकाला त्यावेळी पाण्याची आवश्यकता नाही हे समजून जा.
खतमात्रा देताना मावळतीला दुपारनंतरच द्यावी. शक्यतो पौर्णिमा बघून द्यावीत, दाणेदार खते मातीआड करावीत आणि खतांचा पीएच बघून मात्रा द्यावी.
शिवानंद नेगी, भडगाव गडहिंग्लज हे एअरोनॉटिकल इंजिनिअर.असून शेतीची आवड असल्याने शेतीत विविध प्रयोग करतात, महाराष्ट्रातील ७४ हजार शेतकऱ्यांना ते माती, पाने परिक्षण, मृद्परीक्षण, पर्जन्यमान, मातीचा पी एच आदींबाबत सेवा देतात. त्यांचा मातीचा मोठा अभ्यास आहे. सात सव्वा सातच्या वर पी. एच. असलेली खते वापरून नयेत.असा ते शेतकऱ्यांना सल्ला देतात. पिकांची आवश्यकता बघूनच त्या त्या वेळी पाणी द्यावं. जीएचा वापर अती आहे. आपल्याकडे जीए आवश्यक नाही. कॅल्शियम वरुन फवारणीद्वारे द्यावे. ऊस पिकाला ते खूप गरजेचे आहे.
पाण्यातपाणी देऊ नये, बुरशीमुळे खोडवा उत्पादन कमी होते. बुरशी तपासून घातक बुरशीचा मित्रबुरशीने नायनाट करुन सात साडेसात पीएच प्रमाण सांभाळले तर लागणीपेक्षा खोडव्याचे उत्पादन जास्ती येऊ शकते.
परिसंवादाचे सूत्रसंचालन आणि आभार माणिक चंदगडे यांनी केले.