चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी येथील एसी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. वडिल मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रियंका जारकीहोळी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
प्रियंका यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य, दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार लक्ष्मण सवदी, गणेश हुक्केरी, राजू कागे, महेंद्र तमन्नावार, विश्वास वैद्य, आसिफ (राजू) सेठ आणि महांतेश कौजलगी, बाबासाहेव पाटील उपस्थित होते.
तसेच उमेदवारी प्रक्रिया संपेपर्यंत माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए. बी. पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, श्याम घाटगे, बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षा विनय नावलगट्टी, उत्तम पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते, डॉ. उत्तम पाटील यांच्यासह शेकडो नेते चिक्कोडी येथील एसी कार्यालयाच्या आवाराबाहेर उभे होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचे सांगितले. पण त्या किती फरकाने विजयी होतील ते आताच सांगता येणार नाही. आज प्रियंका जारकीहोळी यांनी मंत्री, आमदार, आमदार, माजी आमदार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर करून सर्वांचे आभार मानले.