Tuesday , July 23 2024
Breaking News

चिक्कोडीत पावसाचा जोर! कृष्णेच्या पातळीत 5 फुटाने वाढ

Spread the love

चिक्कोडी : चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारी (ता. १८) देखील कृष्णा नदीवरील एक, दूधगंगेवरील चार व वेदगंगेवरील तीन असे आठही बंधारे पाण्याखालीच होते. पाऊस कायम असल्याने कृष्णेच्या पातळीत पाच तर दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत दोन-तीन फुटांनी वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास महापुराचा धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हा, चिक्कोडी उपविभाग व सर्व तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

शुक्रवारी देखील कृष्णा नदीवरील येडूर-कल्लोळ, दुधगंगेवरील बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दत्तवाड व वेदगंगेवरील जत्राट-भिवशी, सिदनाळ-अक्कोळ, भोजवाडी-शिवापूरवाडी हे आठही बंधारे पाण्याखालीच होते. चिक्कोडी उपविभागातील सर्वच तालुक्यात पाऊस कायम होता. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा, दूधगंगा, वेदगंगेसह त्यांच्या उपनद्यांची पातळी वाढत आहे.

दूधगंगा व वेदगंगा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे काठावरील शेतात पाणी पसरून नुकसानीला शेतकऱ्याना सामोरे जावे लागत आहे. काठावरील अनेकांच्या विद्युत मोटारी पाण्याखाली गेल्याने चिंता वाढली आहे. नद्यांचे पाणी वाढल्यास परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्यामुळे काठावरील नागरिक जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या तयारीत आहेत. गंभीर प्रसंग टाळण्यासाठी तशा सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पूर आल्यास नियंत्रणासाठी नियोजन

आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास यंदाही महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने पूरनियंत्रणासाठी चिक्कोडी प्रांताधिकारी कार्यालयामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे. तालुका निहाय दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफ पथक येडूर येथे दाखल झाले असून कृष्णा काठावर ते लक्ष ठेवून आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी – सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *