बेळगाव : मा.उच्च न्यायालयाचा आदेश तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने हालगा-मच्छे बायपास प्रकरणी झिरो पॉईंट ग्रहित झाल्याशिवाय बायपासचे कोणतेही काम सूरु करु नये असा निर्वाळा देत दावा सुरु आहे. पण त्या सर्व आदेशांना हरताळ फासत आताच नवीन रुजू झालेले प्रांताधिकारी, महामार्ग प्राधिकरण खात्याचे मुख्य अधिकारी, तहशिलदार, ठेकेदार मिळून बायपासमधील शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटून त्यांना भेडसावत तुमची जमीन बायपाससाठी भूसंपादन केली आहे तिथून काम सूरु करणार म्हणून मानसिक हनन करताहेत. हे सर्वस्वी चुकीचे आणि न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यासाठी मा.पोलीस आयुक्त बेळगाव यांनी वरील अधिकारी, ठेकेदार यांना न्यायालयाचा झिरो पॉईंटचा निर्णय होईपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणताही मानसिक त्रास देऊ नये असा आदेश द्यावा. त्याचबरोबर बायपासमधील शेतकऱ्यांना सदर अधिकारी, ठेकेदारापासून संरक्षण पूरवावे, असे कर्नाटक राज्य रयत संघटना बेळगाव तालूकातर्फे आज सकाळी 11.30 ला मा.पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ते देताना प्रकाश नायक, राजू मरवे, महेश चतूर, अनिल अनगोळकरसह इतर शेतकरी होते.
