व्यावसायिक बनले कर्जबाजारी : लगीनसराई, उत्सव बंद असल्याचा परिणाम
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने अनेक निर्बंध घालत अत्यावश्यक सेवा विक्री व्यवसाय सुरू आहे. मात्र निपाणी तालुक्यातील कापड दुकानदारांची मागील दोन वर्षांची कोट्यवधीची उलाढाल या परिस्थितीमुळे बुडाली आहे. लग्न समारंभ, यात्रा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना बंदी घातल्याने तयार कापड विक्री व्यवसायासमोर कोरोना काळात मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून यंदाही दोन महिन्यापासून बंद असलेला कापड व्यवसाय अजूनही सुरू झालेला नाही. त्यामुळे कोरोनाने कापड व्यवसायाला गुंडाळण्याचे चित्र निपाणी तालुक्यात दिसत आहे. तालुक्यातील आर्थिक उलाढालीचा महत्त्वाचा भाग असलेला कापड व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून संकटात आहे. ऑनलाईन कपडे खरेदी करणारा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावागावात कापड विक्री थेटपणे होत आहे. रस्त्यावरील कापड विक्री आणि कपड्यांचे महासेल या संकटातून मार्ग काढत कापड दुकानदार तग धरत आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट पुढे आल्याने बाजारपेठेत कापड विक्री बंद झाली आहे. कापड विक्री अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने गतवर्षी तीन महिने व या वर्षी दोन महिने कापड खरेदी विक्री व्यवसाय पूर्णतः बंद आहे. दरवर्षी उन्हाळी हंगामात लग्नसराईच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कापड किंवा तयार कपडे खरेदी केले जातात. सर्वसाधारण कुटुंबातील मुलाचे किंवा मुलीचे लग्न असले तर सरासरी 50 हजार रुपयांपेक्षाअधिक कपडे खरेदी केले जातात. निपाणी तालुक्याचा विचार करता 29 ग्रामपंचायती अंतर्गत सरासरी दोन विवाह सोहळे वर्षाला होत असतील तरी एक 100 पेक्षा अधिक विवाह सोहळ्यांवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बंधने आली. वधू – वर कुटुंबे मिळून दोन घरांमधील लग्न समारंभाचा कार्यक्रम यंदा अगदी थोडक्यात उरकण्यात आला. कोरोनाची सगळी बंधने पाळून सोहळे झाले. मात्र अशा विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापड खरेदी झाली नाही. याचे कारण गेल्या एप्रिलपासून हा व्यवसाय पूर्णतः बंद आहे. बंदीमुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील कापड व्यवसाय चिंतेत सापडला आहे. सर्वाधिक विक्री विवाह सोहळ्यांमध्ये होते. त्यानंतर गणेश उत्सव आणि दिवाळीला थोड्या प्रमाणात तयार कपडे खरेदी केले जातात. वर्षभर चालणारा हा व्यवसाय असला तरी उत्सव कालावधीत किंवा लग्न सोहळ्याच्या वेळी होणारी उलाढालाने व्यावसायिकांचा वर्षभराचा खर्च निघत असतो. मात्र सातत्याने लॉकडाऊनमुळे मोठे कापड शोरूम असलेले व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या दुकानात कमीत कमी दहा कामगारांना सरासरी आठ ते दहा हजार रुपये इतका पगार द्यावा लागतो. त्यातच भाड्याने कापड दुकान असल्यास गाळ्याचे भाडे असा सगळा खर्च व्यावसायिकांच्या माथ्यावर येऊन ठेपला आहे. व्यावसायिक कर्ज उभारून कापड दुकान चालवणाऱ्यांना यंदा कर्जाच्या खाईत लोटले आहे.
पुढच्या काळातही चिंताच
कर्नाटक, महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था गेले दोन महिने बंद आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत नाहीत. आता पावसाळा झाल्याने पुढच्या दोन महिन्यात कापड खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अभावानेच असणार आहे. या सगळ्याचा फटका कापड व्यावसायिकांना बसणार आहे.
‘वर्षानुवर्षे काम करत असलेल्या कामगारांना दुकान बंद असले तरी पगार द्यावाच लागत आहे. अनेक व्यावसायिकांना भाडेही भरावे लागत आहे. त्यामुळे कापड व्यावसायिक कर्जबाजारी होत आहेत. तालुक्यात अजूनही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे कापड व्यवसायाला विक्रीची परवानगी केव्हा मिळणार याबाबत शंका आहे. मात्र यंदा गणेशोत्सव आणि दिवाळीत किमान कापड व्यवसाय विक्रीला संधी मिळावी इतकीच अपेक्षा आहे.’ – सुहास दुधाने, कापड व्यवसायिक, निपाणी
एक नजर…
* निपाणी शहरात 150 पेक्षा अधिक कापड दुकान, * ग्रामीण भागात 130 दुकाने, * कापड व्यवसायात 250 मजूर, * कोट्यावधींची उलाढाल ठप्प, * दुकान भाडे, मजुरांचा खर्च वाढला.