(कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र या संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर)
कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या 4 जून रोजी निघालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य दिनांक ७ जूनपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होणार आहे. पण या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यातील गेल्या पंधरा महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसायाचा शासनाने समावेश केलेला नाही. याचा अर्थ इतर व्यवसाय प्रमाणे नियम पाळून आमचा पण आम्ही व्यवसाय सुरु करायचा?
शासन नेहमीच कोचिंग क्लासेसची तुलना शाळा-महाविद्यालयीनसोबत करीत असते. पण शासनाने यापुढे खासगी कोचिंग क्लासेसची तुलना शाळा महाविद्यालय बरोबर करू नये. शाळा दिवाळीपर्यंत ऑफलाइन सुरू होणार नाहीत त्यामुळे तेवढे दिवस कोचिंग क्लासेस व्यवसाय बंद ठेवता येणार नाही. तसेच राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गेल्या पंधरा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय व हलाखीची झाली आहे.
इमारतीचे भाडे भागवणे, शिक्षकांचा पगार देणे, त्याचप्रमाणे घरखर्च चालवणे सुद्धा खूप अडचणी झालेले आहे. शासनाने या व्यवसायाला दोन्ही लॉकडाउनच्या कालखंडामध्ये कोणत्याही स्वरूपाची मदत केलेली नाही. कोचिंग क्लासेस व्यवसायिकाकडून सर्वात वरचा लक्झरिअस टॅक्स वसूल केला जातो. पण कोणत्याही स्वरूपाची मदत दिली जात नाही. पण आज या व्यवसायिकांचा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने कोचिंग क्लासेस व्यवसायिकांच्या अडचणींचा विचार करून त्यांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी “कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र”यांच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने आज निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुंडलिक जाधव, जिल्हा सचिव प्रा. संभाजी सावंत, उपाध्यक्ष प्रा. बाजीराव कोंडेकर व प्रा. सुधाकर कोरवी व इतर सर्व क्लास संचालक उपस्थित होते.