जोल्ले कोविड सेंटरमध्ये उपक्रम : इंद्रजीत देशमुखांची प्रेरणा
निपाणी (संजय सुर्यवंशी) : ’माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या उक्तीप्रमाणे कोल्हापूर येथील माजी कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या प्रेरणेतून समाजाला काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या रोगाला हटवण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक आपआपल्यापरिने मदत करीत आहेत. भजनाच्या माध्यमातून कोरोना रुग्णाचे आत्मबल वाढविण्याचा एक वेगळा उपक्रम अनंत घोळवे व त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे. जोल्ले कॉलेज कोविड सेंटर येथे भजनाच्या माध्यमातून रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे.
दोन वर्षापासून महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पुढाकाराने शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलमध्ये शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे तज्ञ डॉक्टरकडून कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. याशिवाय चहापाणी, नाश्ता, जेवण याचीही उत्कृष्टपणे सोय केली आहे त्यामुळे हे सेंटर सर्वांना आता जवळचे झाले आहे. केवळ औषधोपचार व जेवणावर न थांबता येथील रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही रुग्णांसाठी भावगीत भक्तीगीत भजन आशा उपक्रमातून कोरोना रुग्णांना दिलासा दिला जाता आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर नसून स्वत:चे घरच असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे. परिणामी सेंटरबाबत नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाले आहे. अनंत घोळवे यांनी सादर केलेल्या भजन गायन कार्यक्रमात अजित शिंदे-गळतगा, सागर मांगले, देवकी घोळवे, पांडुरंग बांबरे, श्रवण पडळकर, धनाजी घोरपडे यांनी गायन साथ केली. तर प्रतिमा हवळ, प्रथमेश हवळ, ओम घोळवे, अवधूत जाधव यांनी तबला साथ केली. कोरोना रुग्णासह डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचार्यांनी भजनाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी देवचंद महाविद्यालयातील निवृत्त उपप्राचार्या प्रा. कांचन बिरनाळे, रोहन मस्के यांचे विशेष सहकार्य लाभले.
