घटनास्थळी प्रचंड पोलिस फाटा तैनात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथूनच जवळ असणाऱ्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील बसस्थानक नजिक गट नंबर ६४ मध्ये विनापरवाना अज्ञातांनी दि. २० रोजी रात्री शिवपुतळा उभारला होता. कोणतीही परवानगी न घेता एका रात्रीत बेकायदेशीरपणे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महसूल व पोलीस प्रशासनाने १२ तासांच्या आत कारवाई करत हटवला.
हडलगे येथे गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती व दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामेळी या गावातीत वातावरण शिवमय असते. यातून आपल्या गावामध्ये शिवपुतळा उभारण्याची प्रेरणा काही ग्रामस्थांना व युवकांना मिळाली. यातूनच सोमवारी मध्यरात्री अज्ञातानी बसस्थानक नजिक केंद्रशाळेसमोरच्या प्रवेशद्वाराजवळ छ. शिवरायांचा भव्य पुतळा चौथऱ्यावर बसवल्याचे सकाळी सर्वांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी चिऱ्याच्या बांधकामात चबुतरा, सिंहासनारूढ छ. शिवाजी महाराज पुतळा, लोखंडी कंपाऊंड, भगवे झेंडे लावण्यात आले होते. एका रात्रीत उभारलेला पुतळा पाहून ग्रामस्थ आवक झाले. गावाभर पुतळ्याबाबत चर्चा सुरू झाली होती. सोशल मेडियावर याचे फोटो व व्हीडीओ व्हायरल झाले. याची माहिती नेसरी पोलिसांना कळताच पोलिसांनी हडलगेकडे धाव घेतली. या पुतळ्या संदर्भात कोणतिही परवानगी घेण्यात आली नव्हती. दुपारी प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला. पुतळा हटवता ना पोलिसानी कोणालाही जवळ घेतले नाही. यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री. गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, मंडळ अधिकारी संजय राजगोळे आदी उपस्थित होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुतळा उभा करणाऱ्या अज्ञाता विरोधात कारवाई करणार असल्याचे स पो नि संदिप कांबळे यांनी बेळगाव वार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आजही या ठिकाणी पोलिस उपअधिक्षकासह परिसरातील सर्वच पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्यासह ५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज बांधकाम केलेल्या चौथराही पोलिसानी हटवला. सध्या हडलगे त तणाव पूर्ण शांतता आहे.