गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी पती निधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अंनिसने केला हलका. नाभिक समाजातील श्रीमती शांताबाई यादव वय वर्षे 72 रा.हसुरसासगिरी ता. गडहिंग्लज यांचे पती श्रीपती यादव यांचे 40 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि शांताबाई यांच्यावर जणू काही दुःखाचा डोंगर कोसळला. लहान लहान चार मुली त्यांच्या पदरात होत्या. चांगुना, शोभा, सुनिता व संगीता या मुलींचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. ऐन तारुण्यात पतीचे निधन झाले पण शांताबाई मनाने खचल्या नाहीत. दुःख बाजूला सारून नवऱ्याचा केशकर्तन करण्याचा पिढी-जात धंदा आपण स्वतः करायचा आणि कुणाकडेही भीक न मागता आपल्या मुलींचा सांभाळ करायचा या जिद्दीने शांताबाईने नवऱ्याचा वस्तारा आणि कात्री हातात घेतली कै. हरिभाऊ बाबाजी कडूकर यांची पहिली दाढी व केस कटींग करून त्यांच्या पाठबळाने व प्रेरणेने पुरुषांच्या “दाढी व केस कटिंग”चा व्यवसाय चालू केला. एका छोट्याशा खेडेगावात त्या काळात बाईने असा पुरुषांचे केस -दाढी कटिंग करणे ही बाब सगळ्यांच्या चर्चेचा व चेष्टेचा विषय झाला. पण निर्धाराने शांताबाईने हा व्यवसाय नेटाने करून आपल्या चार मुलींना चांगले शिक्षण दिले त्यांची लग्ने करून दिली. मुलींचा सुखाचा संसार सुरू झाला.
त्या काळात “केश कर्तनाचा व्यवसाय करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच कर्तृत्ववान महिला” म्हणून त्यांना आजवर राज्य आणि देश पातळीवरील शेकडो पुरस्कार, मान -सन्मान मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर यशोभूमी दिल्ली येथे सप्टेंबर 2023 ला पीएम विश्वकर्मा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार झाला. मात्र डोक्यावर होता जटेचा मोठाभार ही बाब अंनिसचे प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे यांना सतत अस्वस्थ करीत होती. एकीकडे पुरोगामी, धाडसी विचार आणि दुसरीकडे अंधश्रद्धेचा डोकीवर मोठा भार ही विसंगत बाब खटकत होती. त्यासाठी शांताबाई यांच्या घरी जाऊन चार-पाच वेळा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रा. अश्विनी पाटील व प्रा. रामदास रणदिवे यांनीही मोलाचे सहकार्य केले होते. मात्र शांताबाई काही केल्या जटेला हात लावून देत नव्हत्या एकीकडे सिद्धनेर्लीच्या जिजाऊ सामाजिक संस्थेचा पुरस्कार, बारामतीच्या शरयू फाउंडेशनचा पुरस्कार, सोलापूर येथील नाभिक ज्ञाती संस्थेचा पुरस्कार, राष्ट्रीय नाभिक महासंघ महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे, स्त्रीशक्ती फाउंडेशन कराड, तिरंगा प्रतिष्ठान पुणे. इत्यादी शेकडो पुरस्कार त्यांना देऊन गौरविले आहे मात्र डोईवरील जटेचा भार उतरवायला कोणी पुढे आले नाहीत. अखेर गडहिंग्लज शहर शाखेच्या वतीने प्रा.प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, अशोक मोहिते, प्रा.अश्विनी पाटील यांनी शांताबाई यांच्या कन्या शोभा यादव यांच्या विशेष सहकार्यातून अखेर शांताबाई यांना जटामुक्त केले आणि “अंधश्रद्धेची होळी करून विज्ञानवादी विचारांची खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली” त्यामुळे अंनिस कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक होत आहे. जटा निर्मूलन करताना यावेळी शांताबाईंच्या चारही मुली शोभा, चांगुना, सुनीता, संगीता व नात कु. वैष्णवी याही उपस्थित होत्या. यावेळी शांताबाई यांनी जटा काढून घेतल्याबद्दल प्रा. अश्विनी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ, साडी चोळी देऊन त्यांचा व त्यांच्या पुरोगामी, परिवर्तनवादी विचारांचाही गौरव करण्यात आला.