खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड भागातील बेकवाड गावात हत्तीचे आगमन झाले असून बेकवाड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोल्लीहळ्ळी आणि नंदगड वन खात्याचे अधिकारी बेकवाड येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर हत्ती गंदिगवाड व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान करून काल रात्री बेकवाड गावात त्यांचे आगमन झाले असल्याचे समजते. आज शनिवारी 23 मार्च रोजी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हत्तीला पाहण्यासाठी संपूर्ण बेकवाड व पंचक्रोशीतील नागरिकांचे गर्दी, त्या ठिकाणी झाली आहे. गोल्लीहळ्ळी आणि नंदगड येथील वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी सदर हत्तींना हुसकावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हत्ती आल्याची माहिती समजताच गोल्लीहळ्ळी व नंदगड विभाग वन खात्याचे अधिकारी व नंदगड पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी बेकवाड येथे तातडीने धाव घेतली असून, हत्तीना जंगलात हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये
गोल्लीहळ्ळी विभाग डेप्युटी आरएफओ अशोक बी हुली, डेप्युटी आरएफओ नंदगड विभाग महेश लक्ष्मण लच्यन तसेच नंदगड पोलीस स्थानकाचे एएसआय मोकाशी व शिवकुमार तुरमुंडी, व वन खात्याचे बीट फॉरेस्ट इराप्पा करलिंगन्नावर, बीट फॉरेस्ट गिरीश मेक्कदे, बीट फॉरेस्ट कित्तूर देगांव या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यांत भाग घेतला आहे.