बेळगाव : आनंदवाडी कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी “जय महाराष्ट्र” म्हणण्यास विरोध केला होता त्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरातून त्या घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी देखील त्या उद्योजकाचा निषेध नोंदवला होता. याप्रकरणी शुभम शेळके यांच्यावर गुन्हे नोंद करत त्यांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात पोलीस उपायुक्त आणि माळमारुती पोलिसांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
समिती युवा नेते शुभम शेळके यांनी प्रसारमाध्यमांवर कायद्याच्या चौकटीत राहून आपला निषेध नोंदवला होता. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेली नाही तरीदेखील पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांच्यावर गुन्हा नोंद करून शेळके याना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. शुभम शेळके यांच्यावर झालेली कारवाई पूर्णतः घटनेच्या विरोधात असून त्यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्हा रद्दबादल ठरवावा त्याचप्रमाणे पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी याचिका ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंद्रे, ऍड. बाळासाहेब कागणकर, ऍड. वैभव कुट्रे यांनी दाखल केली आहे.