किरण जाधव यांच्या हस्ते केले गेले भूमिपूजन
बेळगाव : शास्त्रीनगर, बेळगाव येथील श्री गणेश मंदिरा समोरील खुल्या जागेत सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी करण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला.
याप्रसंगी कोर समितीचे मानद अध्यक्ष प्रकाश व्ही. नेतलकर,
मानद उपाध्यक्ष महांतेश बी. जिगाजिन्नी, मानद सचिव अरुण एस. कामुले, मानद संयुक्त सचिव रामप्रसाद बी. बांगड, मानद कोषाध्यक्ष श्रीकांत बी. देसाई, मानद संयुक्त कोषाध्यक्ष श्रीधन एस. मलिक यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
किरण जाधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर किरण जाधव यांनी कुदळ मारून सभा मंडप आणि देवपूजा विधी कार्यक्रम बांधकामाचा श्री गणेशा केला.
यावेळी मंदिराचे विश्वस्त, शास्त्रीनगर परिसरातील मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते. या कामासाठी सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून यासाठी गणेश भाविकांनी देणगी रूपाने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन गणेश मंदिर विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी केले.
या गणेश मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आता मंदिरासमोरील जागेत सभामंडप आणि धार्मिक विधींसाठी सुविधा उपलब्ध झाल्यास भाविकांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. यासाठी भाविकांनी या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन किरण जाधव यांनीही यावेळी केले.