
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रास्ताविक व स्वागतास चिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले, यावेळी 1 जून 2026 रोजी 1 जून 1986 च्या कन्नडसक्ति आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाभागातील विविध आंदोलनात त्यांना हिंडलगा येथे सर्वांनी उपस्थित राहून त्यांना अभिवादन करण्याचे ठरले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा संदर्भात सरकारी कार्यालयावर व अस्थापनावर मराठी फलक संदर्भात कन्नड वेदिकेने तसेच प्रशासनाने घेतलेल्या विरोधी भूमिकेवरती आवाज उठवण्यासाठी मध्यवर्ती समिती जो आदेश देईल त्याला खानापूर समितीचा पाठिंबा जाहीर करण्यात आला, तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री. धैर्यशील माने आणि समितीची इतर सदस्य यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व विरोधी पक्ष नेते यांच्याशी विचार विनिमय करून मुख्यमंत्री निवासमोर मुंबई धरणे कार्यक्रम करण्यात यावा, असे विचार बैठकीत मांडण्यात आले.
बेळगाव महानगर पालिकेचे मराठी नगरसेवक श्री. रवी साळुंखे, श्री. शिवाजी मंडोळकर व श्रीमती वैशाली भातखंडे यांनी मराठी बना दाखवून आवाज उठविला व सीमाप्रश्न सोडवणूक विरोधी ठराव फेटाळून लावला म्हणून खानापूर म. ए. समितीच्या वतीने त्यांच्या अभिनंदनचा ठराव पास करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातील खटला विनाविलंब सुरू व्हावा यासाठी उच्छाधिकार समिती व तज्ञ समिती बैठक घ्यावी, तसेच 24 मे 2026 रोजी शिवस्मारक येथे मराठी युवक कार्यकर्ते यांची बैठक होऊन मराठी भाषा व संवर्धनासाठी कार्य करण्याचे ठरविले यासाठी म. ए. समिती बळकटी संदर्भात त्यांचे अभिनंदन करण्यात आले, ज्यांनी आमदार जिल्हा पंचायत सदस्य व इतर पण तालुका पंचायत सदस्य विविध संघ संस्थापदे भूषवून राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला आहे, अशा व्यक्तींच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी याची दखल घेऊन पुढील वाटचाल करावी व म. ए. समितीला बाधा येईल असे कार्य कोणीही करू नये, असे विचार माजी आमदार दिगंबर पाटील व श्री. राजाराम देसाई यांनी व्यक्त केले.
या बैठकीला प्रकाश तज्ञ समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, अजित पाटील, जयसिंगराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, एस. एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले, व्ही. व्ही.पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांना लागणारे डीएपी व युरिया तो प्रोजेक्ट करून देणे याबाबत तहसीलदार निवेदन देण्यात आले. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहाय्यक अभियंता हेस्कॉम यांना म. ए. समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याच बरोबर या काळात देहावसान झालेले कै. टी. के. पाटील, कै.अर्जुनराव गोरल व इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी सहसचिव रणजित पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta