कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा बाहेर पडल्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात काल पहाटे पासून सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत कायम होती. यामुळे रात्री नऊच्या सुमारास पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवर पाणी आल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्या नंतरही रात्रभर दमदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली. पहाटे चारच्या सुमारास ही पातळी साधारण २१ फुटांपर्यंत पोचली होती. सायंकाळी चारच्या सुमारासही पातळी २६ फुटांपर्यंत आली आणि पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले.
जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत सरासरी १०४. ३ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतीवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून यापूर्वीच हवामान खात्याने अतीवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. आजरा तालुक्यात काही ठिकाणी घर, गोठा यांचे पडझड होऊन सुमारे पन्नास हजारांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.