बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा या फाउंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निवारा केंद्राच्या आवारात 25 वेगवेगळ्या फळांच्या रोपांची लागवड करण्यात आली. महानगरपालिकेच्या कमिशनर के. एच. जगदीश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री. जगदीश यांनी निवारा केंद्राबद्दल माहिती सांगितली व जिव्हाळा संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. जिव्हाळ्याच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू यांनी संस्थेच्या विविध कार्याबद्दल माहिती दिली व कधीही कोणत्याही कामासाठी हाक दिल्यास आम्ही तत्परतेने सेवेसाठी हजर होऊ असेही आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्षा माधुरी जाधव, उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, सचिव आरती निपाणीकर, सहकोषाध्यक्षा योगिता पाटील, सदस्य शहाबाज जमादार, शुभम दळवी, श्रीनिवास गुडमनी, संतोष तलपसुर, वृषभनाथ अवलक्की, विनय पाटील, सौ. रेडेकर आदी उपस्थित होते.