बेळगाव : बेळगावात ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी ३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स दान केले आहेत. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गुरुवारी ते ‘बिम्स‘ला हस्तांतरित करण्यात आले. याचवेळी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स महानगरपालिका आणि जनसेवा केंद्रांना देण्यात आले.
बेळगावात कोरोना रुग्णांच्या उपचारांत ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीस प्रारंभ केला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत टंचाई दूर करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक आणि लोकप्रतिनिधीनि मदतीचा हात पुढे केला आहे. आमदार अनिल बेनके आणि दानशूरांच्या मदतीतून ३५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आ. बेनके यांच्याहस्ते जिल्हा प्रशासनाला हस्तांतरीत करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले की, बेळगावातील कोरोनारुग्णांसाठी ३ ऑक्सिजन प्रकल्पांचे काम सुरु केले आहे. मात्र सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीत रेणुका ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून ३५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्या माध्यमातून बिम्स इस्पितळाला देत आहोत. गरजूंसाठी त्यांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, डीसीपी डॉ. विक्रम आमटे आदी उपस्थित होते.
