बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले.
बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोविड संदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. कोविड नियंत्रणासह अन्य विषयांवरही चर्चा केली आहे. बेळगावातील बीम्स इस्पितळात चांगली व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक आयुक्त अम्लान बिश्वास आदित्या यांची बीम्स प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. उद्यापासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारून चांगले काम करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या सहयोगातून राज्य सरकार कोविड उपचार, लसीकरण अशा सर्व उपाययोजना करत आहे. एसडीआरएफ फंडातून कोविड निवारणासाठी २ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला ५० हजार रुपये अनुदान यासाठी दिले आहे. २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टॅंक आणि १५०० एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजनरेटर उभारण्याचा आज मंजुरी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात ३०४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन उपलब्ध असून त्यांचा सदुपयोग करण्याची सूचना केली आहे. चिक्कोडीत आरटीपीसीआर चाचण्या करण्यास परवानगी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोविड रुग्णांची खासगी इस्पितळांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अशी लूट न थांबल्यास त्यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरले आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी याआधीच अशी कारवाई केली आहे. रुग्णांची लूट चालू दिली जाणार नाही असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व सरकार स्वीकारणार आहे. कालच अशा मुलांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्यांना शिक्षण देणे, स्वावलंबी बनवणे यासाठी सरकार हरेक पाउल उचलेल. याकामी अनेक मठ, संस्था पुढे आल्या आहेत. सरकारही या मुलांची पूर्ण जबाबदारी उचलेल असे त्यांनी सांगितले.
एकंदर बेळगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये जोश भरला आहे. सावळागोंधळ माजलेल्या बीम्सवर प्रभावी शस्त्रक्रिया केली आहे. आता पुढे काय होते हे पहावे लागेल.