बंगळूर : एकीकडे राज्य कोरोना महामारीने हैराण झालेले असतानाच कर्नाटकातील राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भाजप व कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार नेतृत्वावरून वाद घालीत आहेत. मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही आहेत.
भाजपमधील नेतृत्वाचा वाद काहीसा शांत झालेला असताना आता भावी मुख्यमंत्री कोण? यावरून कॉंग्रेस आमदारांत वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार भलतेच अस्वस्थ झाले. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर रणदीपसिंग सुरजेवाला यांनी याची गांभिर्याने दखल घेतली व राज्याचे आमदार व नेत्यांना इशारा वजा संदेश पाठविला आहे.
प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी जमीर अहमद खान आणि राघवेंद्र इटनाळ यांना सिद्धरामय्या हे पुढचे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर वक्तव्य केल्याबद्दल इशारा दिला आहे. एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात कॉंग्रेस नेतृत्वावरून काही लोक जाहीर वक्तव्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जेव्हा पक्षाला संधी मिळते तेव्हा पक्षाचे हायकमांड व आमदार नेतृत्त्वाबाबत निर्णय घेतील. नेतृत्वाबाबत आतापासूनच कुणीही कोणत्याही प्रकारचे विधान करू नये, अशी ताकीद सुरजेवाला यांनी दिली आहे.
भ्रष्टाचारी भाजप सरकारविरूद्ध कॉंग्रेस आंदोलन करीत आहे. अशा वेळी कॉंग्रेसचा भावी मुख्यमंत्री कोण याबाबत आतापासूनच जाहीर वक्तव्य करू नये, अशी सूचना सुरजेवाला यांनी कोणा आमदाराचे नाव न घेता केली आहे. कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी संघर्ष केला पाहिजे. महाभारताच्या अर्जुनाप्रमाणे लढा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.