
बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत.
सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून मृत्यू झाला. सोबतच्या पाच मुलांनी घाबरून हि गोष्ट कोणाला सांगितली नाही. तसेच रोहित व श्रेयसचे कपडे नदीकाठावर मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवले. सोमवारी रात्रीपर्यंत दोघांचा शोध न लागल्याने पालकांनी मंगळवारी सकाळी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. रोहितचा भाऊ व इतरांनी रोहित व श्रेयस हे अंघोळीसाठी नदीत गेले होते व बुडाले, पण आम्ही घाबरून हे कोणाला सांगितले नाही असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध घेण्यात आला.
त्यावेळी श्रेयसचा मृतदेह लाल ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. नंतर बुधवारी रोहितचा मृतदेह आढळला. दरम्यान, माजी आमदार अरविंद पाटील व काँग्रेस नेता इरफान तालिकोटी यांनी पाटील व बापशेट कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रोहितचे वडील अरुण पाटील व श्रेयसचे वडील महेश बापशेट हे दोघेही माजी सैनिक असून काही वर्षांपासून खानापुरातील दुर्गानगरात कुटुंबियांसमवेत वास्तव्यास होते. खानापूर पोलीस ठाण्यात दुर्घटनेची नोंद झाली आहे.