अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे मृतदेह कृष्णा नदीत सापडले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तब्बल तीन दिवसानंतर शोध मोहिमेतील पथकांना मृतदेह शोधण्यात यश आले.
गावातील पिराच्या उरुसानिमित्त धुणे धुण्यासाठी बनसोडे कुटुंबातील चार भाऊ गेले होते. त्यातील एकजण पाय घसरून पडल्याने कृष्णा नदीत बुडताना बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेले तीन भाऊ देखील कृष्णेत सोमवारी (ता. २८) दुपारी बुडाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन दिवसांपासून एनडीआरएफ, कोबा पथक, पोलिस, अग्निशामक दल व पोहोण्यात तरबेज असलेल्या पथकाने कृष्णा काठावर तळ ठोकला होता.
मंगळवारी परशराम बनसोडे यांचा मृतदेह हाती लागला. अन्य तिघांचे काय झाले, याची काळजी कुटुंबीयांसह परिसराला लागली होती. कृष्णानदी तुडूंब भरल्याने शोधकार्यात व्यत्यय येत होता.घटनास्थळी चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करुन व पथकाला विविध सूचना दिल्या होत्या. पथकाने बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सात वाजण्याच्या सुमारास नदीत बुडालेल्या ठिकाणी सदाशिव बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे, शंकर बनसोडे या तिघांचे मृतदेह पथकाच्या हाती सापडले. कृष्णा काठावर तालुका पंचायत अधिकारी रवी बंगारप्पा, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, उपनिरीक्षक कुमार हाडकर तळ ठोकून होते.
कुटुंबीयांचा आक्रोश, आक्रंदने न पहावणारे
बनसोडे कुटुंबीय तीन दिवसांपासून मोठ्या मानसिक दबावाखाली होते. मंगळवारी एक मृतदेह सापडल्याने त्यांचा धीर खचला. बुधवारी सकाळी एकाच वेळी तिघांचे मृतदेह पाहून त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नाही. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश व आक्रंदने न पहावणारे होते.
एकाचवेळी चार कर्त्या पुरुषांवर काळाचा घाला
गोपाळ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार भावांचे एकत्र कुटुंब नांदत होते. मात्र धुणे धुण्याचे निमित्त करून काळाने बोलावून घेऊन एकाचवेळी चार कर्त्या पुरुषांवर घाला घातला. परिसरातील अशी पहिलीच मोठी घटना असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
सर्व परिसर हळहळला
कृष्णा काठावरील हल्याळसह औरवाड, सप्तसागर, दरुर, हल्याळ, शेगुणशी, हुलगबाजी परिसरातील नागरिकांनी तीन दिवसापासून गर्दी केली होती. चारही भावांचे काय झाले, याची चिंता त्यांना लागली होती. अखेर बुधवारी सकाळी उर्वरित तिघांचे मृतदेह सापडल्याने सर्व परिसर हळहळत होता.