खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायोगौडा कुटुंबीयांनी पंढरीच्या वारीतील डेकोरेशनचा सोहळा साकारला आहे. त्यामध्ये रथात आळंदीहून पंढरपूरकडे येणारी पालखी, वरकरींचे रिंगण, वारकऱ्यांकडून होणारा विठ्ठलाचा जयघोष, वारकऱ्यांकडून खेळली जाणारी फुगडी, विविध उपक्रम यात साकारलेले आहेत. प्लास्टिक बाहुल्या च्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. महिला वारकऱ्यांना साड्या, पुरुषांना आवश्यक ते पोशाख, आकर्षक मिशाही काढण्यात आल्या आहेत. त्यांच्या हातात भगव्या पताका देण्यात आल्या आहेत. शिवाय रिंगणातील घोड्यावर घोडा हाकणारा चोपदार, डोळे दिपून टाकणारा हालता देखावा साकारण्यात आला आहे. गेले पाच-सहा दिवस सदर देखावा पाहण्यासाठी बेकवाड व परिसरातील अनेक लोक गर्दी करत आहेत. अनंत चतुर्थी पर्यंत हा देखावा लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. रायोगौडा कुटुंबीयांमध्ये चार वारकरी आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे त्यांना पंढरपूरची वारी करता आली नाही. आपल्या घरातील गणपतीसमोर पालखीचा देखावा सादर करून पंढरपूरची वारी करावी हा उद्देश समोर ठेवूनच ही सजावट करण्यात आली आहे. रोज आरती, भजन, महिलांकडून मंगळागौरी, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.
