खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गेल्या तीस वर्षांपूर्वी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तालुक्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगांवकर यांनी शनिवारी शिवस्मारक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, यशवंतराव पाटील, मारूती मादार, विद्याधर बनोशी, खाचापा काजुनेकर, विश्वभारती क्रीडा संकुलनचे अनिल देसाई, कार्यदर्शी भैरू पाटील, दामोदर कणबरकर, विनोद गुरव, कोच एल. जी. कोलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन विलास बेळगावकर म्हणाले की, आमच्या सोसायटीला ३० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यापूर्वी सामाजिक बांधिलकी समजुन विविध उपक्रम राबवले आहेत.
तेव्हा येत्या ८ डिसेंबर रोजी सकाळी खानापूर पारिश्वाड रोड येथील जांबोटी सोसायटी पासून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होऊन जांबोटी रोडवरील मोदेकोप क्राॅस परत खानापूर येथे स्पर्धेची सांगता होणार आहे. ही स्पर्धा २१ किलोमीटर अंतराची राहणार आहे.
या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत १८ वर्षावरील पुरूष स्पर्धकाना भाग घेता येईल. विजयी स्पर्धकांना अनुक्रमे ११ हजार रूपये, ८ हजार रूपये व ६ हजार रूपये व मान चिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. याशिवाय २१ कि.मी. अंतर पार केलेल्या स्पर्धकाना प्रमाणपत्र देणार आहेत.
शिवाय भाग घेतेलेल्या स्पर्धकाना टी शर्ट देण्यात येतील.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याहस्ते होणार असून बक्षीस वितरण गोवा येथील लोकोत्सव सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याहस्ते होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धकानी सहभाग दर्शवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta