खानापूर (प्रतिनिधी) : नागुर्डा (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शहिद जवान संतोष कोलेकर यांचे पूणे येथे रेजिमेंटच्या इस्पितळात रविवारी दि. 19 रोजी आकस्मिक निधन झाले.
सोमवारी दि. 20 रोजी पुण्याहून त्यांचा पार्थिवदेह बेळगावला आणण्यात आला. तेथून खानापूर येथील मलप्रभा क्रिडांगणावर आणण्यात आले. यावेळी खानापूर जनतेने दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तेथून त्यांच्या मुळ गावी नागुर्डा येथे पार्थिवदेह आणण्यात आला. यावेळी नागुर्डा गावात अंतिमयात्रेसाठी हजारो जनसमुदाय लोटला होता. पार्थिवदेह आणण्यात आलेल्या वाहनाला फुलांनी सजविले होते. भारत माता की जय, संतोष कोलेकर अमर रहे, अशा घोषणा देत नागुर्डा गावातून अंत्ययात्रा निघाली. खानापूर तालुक्यातील हजारो देशप्रेमीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. यावेळी अंतिम दर्शनासाठी भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे तसेच विविध पक्षाचे नेते मंडळी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आदीनी उपस्थिती दर्शविली. लष्करी पध्दतीने बंदुकीच्या सात फैरी झाडून अश्रूनयनांनी शेवटचा निरोप दिला.
