खानापूर : गोवा हेल्थ फाउंडेशनमार्फत रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी पणजी येथे २१ कि.मी. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांनी १ तास ४७ मि. नियोजित अंतर पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एकीकडे युवा पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना खानापूर सारख्या तालुक्यातील युवकांना कल्लाप्पा मल्लाप्पा तिरविर हे खेळ व खेळाचे महत्व पटवून देत आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना खेळाची आवड निर्माण झाली. यानंतर खो – खो, कबड्डी यासारखे खेळ खेळताना १९९० पासून ते २०२३ पर्यंत सुमारे ३३ वर्षांच्या कालावधीत ते लांबपल्ल्याचे आंतरराष्ट्रीय धावपटू बनले. आतापर्यंत त्यांनी ५ वेळा ५० कि.मी., ३० वेळा ४२ कि.मी. फुल मॅरेथॉन, ५० वेळा २१ कि.मी., ४० वेळा १० किमी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तर २०१८ मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत पाच किलोमीटर जलद चलनीच्या प्रकारात पाचवा क्रमांक मिळवून भारतामध्ये आपल्या गावाबरोबरच तालुक्यातील नाव देशपातळीवर उज्वल केले. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पवार, ए. जी. पाटील, लक्ष्मण पाटील तसेच महालक्ष्मी ग्रुपचे संचालक यल्लाप्पा तिरविर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.