खानापूर : मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करणारी संस्था म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील बारा वर्षांपासून मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे. मराठी भाषा टिकविण्याचे व्रत घेतलेल्या मराठी प्रतिष्ठानच्या पाठीशी सामान्य मराठी भाषिक राहिला तर येणाऱ्या काळात मराठीला चांगले दिवस येतील यात शंकाच नाही.
कर्नाटक शासनाकडून सीमाभागात मराठी भाषा संपविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत असताना मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी टिकविण्याचे काम होत आहे. प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षेला खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन आपल्यातील सुप्त कलागुण दाखवून द्यावेत, असे मत प्रा. अरविंद पाटील यांनी व्यक्त केले.
ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर हे होते.
यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक करलगेकर, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार, समिती नेते आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, डी. एम. गुरव, प्रकाश चव्हाण, पी. के. चापगावकर, अर्जुन देसाई, प्रा. आय. एम. गुरव, निरंजन सरदेसाई आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कापोलकर म्हणाले की, गेल्या बारा वर्षात संघटनेने अनेक चढउताराचा सामना करत मराठी भाषा टिकविण्यासाठी अनेक पाईक एकत्र करत ही संघटना बळकट केली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत विविध स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही हाती घेतले आहे. आजच्या निबंध स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनिय आहे.
पुढच्या रविवारी होणाऱ्या सामान्य ज्ञान स्पर्धेला देखील 1000 पेक्षा जास्त व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. खानापूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर लवकरच मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचनालय चालू करून शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्रतिष्ठानतर्फे आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद मादार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शंकर गावडा यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta