खानापूर : खानापूर विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. विठ्ठल हलगेकर हे जरी भाजपचे प्रबळ दावेदार असले तरी नियती फौंडेशनच्या अध्यक्षा भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना ग्रामीण भागातील महिला वर्गाची पहिली पसंती आहेत. तथापि भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद कोचेरी हे देखील भाजप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर माजी तालुका पंचायत सदस्या धनश्री सरदेसाई यांचे नाव देखील चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच माजी आमदार अरविंद पाटील समितीशी काडीमोड घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते देखील विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत मात्र सत्तेच्या लालसेपोटी समितीला रामराम ठोकून भाजप प्रवेश केलेल्या माजी आमदारांचा पक्षश्रेष्ठी उमेदवार म्हणून विचार करतील की निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देतील हे पाहणे देखील कुतूहलाचे ठरणार आहे.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांना केवळ 5133 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. साखर कारखाना व महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेपर्यंत पोचलेले विठ्ठल हलगेकर उमेदवारीसाठी आग्रही आहेत. निवडणुका समोर ठेवून त्यांनी तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहेत. मागील निवडणुकीत भाजपात जोतिबा रेमाणी यांनी बंडखोरी केल्यामुळे विठ्ठल हलगेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
डॉ. सोनाली सरनोबत या देखील उमेदवारीच्या दावेदार आहेत. ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा डॉ. सोनाली सरनोबत यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यांनी नियती फौंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूना मदत केली आहे.
महिला सक्षमीकरणाबरोबर त्यांनी जनसामान्यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात देवलत्ती व परिसरातील गावात वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. पथदीप बंद पडले होते. वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी कानाडोळा कारत होते. ही बाब डॉ. सोनाली सरनोबत यांच्या लक्षात आली तेव्हा योग्य तो पाठपुरावा करून वीजपुरवठा सुरळीत चालू करून दिला. त्याचप्रमाणे तालुक्यातील दुर्गम भागातील जवळपास 35 खेड्यांना रेशन पुरवठा करण्यात व्यत्यय येत होता. नागरिकांना रेशन आणण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत होती त्या गावात रेशन पुरवठा सुरू करण्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोरोना काळात देखील त्यांनी देगाव, आमगाव सारख्या दुर्गम भागात रेशन किट व मास्क वाटप सारखी कामे केली आहेत. तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत त्या पोचलेल्या आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे असो की गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे असो डॉ. सोनाली सरनोबत या तत्परतेने धावून जातात व त्यांच्या समस्या सोडवितात. एकंदर डॉ. सोनाली सरनोबत यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांनी राजकारणासोबत समाजकारणाची सांगड अगदी व्यवस्थित घातली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेच्या मनात डॉ. सोनाली सरनोबत यांनी वेगळे स्थान मिळविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या उमेदवारीचा नक्कीच विचार करेल यात शंकाच नाही.
Belgaum Varta Belgaum Varta