लोंढा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन
खानापूर : तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या समस्यांचा केवल खेळ मांडण्यात आला. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात विकास कामांद्वारे चोख उत्तर दिले आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबरोबर रोजगाराभिमुख विकासावर आपण भर देणार असून सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
लोंढा गावात गुरुवारी प्रचार फेरी काढून घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. जनता कॉलनीत सभेत बोलताना आमदार डॉ. निंबाळकर म्हणाल्या, महिलांच्या सबलीकरण आणि स्वावलंबनासाठी सत्तेवर येताच काँग्रेस ठोस योजना लागू करणार आहे. गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्यांची भाकरी महाग झाली आहे.
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून अन्यायकारक कर वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दहा वेळा विचार करणारे भाजप सरकार कर्जबुडव्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करते. हे बदलण्यासाठी काँग्रेसला मत द्या.
विरोधक सत्तेसाठी मतयाचना करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. विकासाबरोबरच सामाजिक ऐक्य आणि शांती प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी काँग्रेसच्या हातातच तालुक्याचे आणि राज्याचे भविष्य सुरक्षित आहे, असेही त्या म्हणाल्या. विकास कामांची उर्वरित ध्येयपूर्ती साकार करण्यासाठी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितली.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शेवरिन डायस, समीर खानजादे, मिलाग्रिज डिसोझा, दौलत खानझाडे, सिरिल डिसोझा, मोटेस सोजा, कापोली ग्रामपंचायत अध्यक्ष संदीप देसाई, रेश्मा पठाण, संतोष मिनेन्झीस, मंजू आंबेकर, लक्ष्मण नायक आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta