हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा
खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठी समितीला मत द्या, असे आवाहन रणजित पाटील यांनी केले. हलगा (ता. खानापूर) येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली आणि सभेत ते बोलत होते.
प्रारंभी विठ्ठल गुरव यांनी स्वागत केले. हलगा भागाने नेहमीच सीमाप्रश्नी समितीला साथ दिली आहे. आणीबाणीच्या वेळी हलगा भागातील मराठी भाषिकांनीच समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या राष्ट्रीय पक्षांनी अनेक आमिषे दाखवून मराठी भाषिकांना आपल्या वळचणीला बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, या भागातील जनता स्वाभिमानी असून ती कोणत्याची आमिषाला बळी पडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. हलगासह विविध गावातील नागरिकांनी यावेळी स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभाग घेत मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या सभेलाही मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, ज्ञानेश्वर सनदी, अप्पाण्णा इश्राम, डी. एम. गुरव, नरसिंग फटाण, एन. डी. कदम, तुकाराम फटाण, वसंत सुतार, वैशाली सुतार, नीता फटाण, महादेव पाटील, कल्लाप्पा फटाण, सावित्री पाटील, विजय इश्राम, ज्ञानेश्वर सनदी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta