बेळगाव : टीम केअर फॉर यू आणि लोक कल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालय, जांबोटी येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींसाठी ‘मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य महेश सडेकर, शीतल भंडारी, गौरी गजबार, निशिगंधा कानूरकर, संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी असीम ऊर्जा तत्वमसि परफॉर्मिंग आर्ट्स सेंटरच्या निशिगंधा कानूरकर यांनी कलाकारांच्या सहकार्याने कथाकथन आणि भरतनाट्यमच्या माध्यमातून मासिक पाळी संदर्भात जनजागृतीपर कलेचे सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी मासिक पाळी आणि मुलींच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती आणि शंका निरसन करत आपले मत व्यक्त केले. मासिक पाळी हा विषय सर्वांनी सामान्यरित्या चर्चा करण्यासारखा असून स्त्रीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी अशा विषयांवर मुक्तपणे चर्चा होणे आणि जनजगृती होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी असीम ऊर्जा परफॉर्मिंग आर्ट्स सेंटरच्यावतीने निरोगी मासिक पाळीचा संदेश देणारे सादरीकरण करण्यात आले. याविषयी कोणतीही लाज न बाळगता या विषयाकडे व्यापक अर्थाने पाहण्यास सक्षम असावे असा संदेश देण्यात आला. या कार्यशाळेत माध्यमिक महाविद्यालय, जांबोटीच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.