खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालय आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि. २६ रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य निषेध दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम्. एच्. नाईक हे होत. यावेळी रामनगर पोलीस स्थानकाचे पीएसआय श्रीकृष्णकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्ती दिनानिमित्त मार्गदर्शन केले. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्ती असते. तर व्यवसायाच्या नावाखाली, उदरनिर्वाहाच्या नावाखाली बरेच लोक मादक पदार्थाचा व्यवसाय करतात. त्या गुन्हेगारांना पोलिसांच्या हवाली करावे. खेड्यापाड्यांचा उद्धार व्हायचा असेल तर व्यसनाधीनता नष्ट केली पाहिजे. आपण सुखी संपन्न व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याच गावात नोकरी करावी गावातील आर्थिक स्थिती सुधारावी आपल्या प्रत्येकाकडे कला आहे. त्या कलेप्रमाणे कोणी पोलीस, कोणी पीएसआय, कोणी डीसी, कोणी कलेक्टर, कोणी नट, कुणी चित्रकार, कोणी शिक्षक, कोणी प्राध्यापक, कोणी नेता, कोणी पुढारी, कोणी समाजसेवक व्हावे. व्यसनी माणसांना निपटून काढावे व त्याना सन्मार्गाला लावावे. म्हणजेच समाज उद्धार होईल समाजात आज अनेक प्रकारची व्यसने बळावलेली आहे दारू, गुटखा, जुगार, तसेच अफू, गांजा, ड्रग्स, यासारख्या वस्तूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून आजची नवीन पिढी नकळत याकडे वळताना आपल्याला दिसते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने अशा प्रवृत्तीला मुळातच आळा घालून ही प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तर प्राचार्य एम्. ए्. नाईक म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा असते त्यामुळे मादक वस्तू किंवा द्रव्य चाखणे, पिणे, सेवन करणे याकडे त्यांचा कल असतो म्हणून जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न बघता सकारात्मक कृतीने शिक्षण ग्रहण करून समाजात आपली भूमिका आदर्शवत कशी होईल याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी सुगंधा हणबर हिच्या प्रार्थनेने झाली. व्यासपीठावर यावेळी ए एस्. आय बी एस नायक, पोलिस उमेश डी नाईक, श्रीमती मेघना नाईक, श्रीमती भारती कुंभार, राष्ट्रीय सेवा योजनाधिकारी पी एस परब, संजय गौडा, उदयकुमार राणे आणि आणि सर्व अध्यापक पर्यंत वृंद उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच स्काऊट् आणि गाइडचे स्वयंसेवक आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. एम्. एस्. कम्मार यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि शेवटी सगळ्यांचे आभार मानले.