खानापूर : तालुक्यातील नावाजलेल्या नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीचा गैरव्यवहार समोर आला आहे. या खत गोदामावर सहायक कृषी संचालकानी छापा मारला असून खते अधिक दराने विकून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खत गोदाम सील करण्यात आले आहे. तसेच मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नंदगडमधील खानापूर तालुका कृषी उत्पन्न खरेदी-विक्री संघ अर्थात मार्केटिंग सोसायटीत युरिया आणि १०:२६:२६ खतांना अधिक दर घेऊन विक्री केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दुरध्वनीद्वारे सहायक कृषी संचालकांकडे केली होती. त्यावरून सोसायटीच्या खत गोदामावर अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी तक्रार खरी असल्याचे दिसून आले. युरिया खताचा दर २६५ रुपये असतांना ३२० तर १०:२६:२६ चा दर १४२० असतांना १४८० रुपयांना खत विकले जात असल्याचे स्पष्ट झाले. याबद्दल व्यवस्थापक
अभयकुमार महावीर पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच विक्री बंद करण्याचा आदेश बजावून खत गोदाम सील करण्यात आले आहे. सोसायटीच्या गैरव्यवहारामुळे ऐन पेरणी हंगामात खत विक्री बंद झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याला जबाबदार मार्केटिंग सोसायटीच्या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
छाप्यात सहायक कृषी संचालक डी. बी. चव्हाण यांच्यासमवेत कृषी अधिकारी विणा बिडीकर, सहायक कृषी अधिकारी एम. बी. राठोड, मंजुनाथ कुसगल, प्रदीप मुकबसव आणि बिरादार पाटील सहभागी झाले होते. तालुक्यातील खत दुकानदारांनी शेतकऱ्यांची लूट केल्यास दुकानांचे परवाने रद्द करण्याचा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी माजी आमदार बसापन्ना आरगावी यांनी नंदगडमध्ये मार्केटींग सोसायटीची स्थापना केली होती. आताची संस्थेची स्थिती पाहता त्यांचा हेतू काळाच्या पडद्याआड जात असल्याचेच दिसून येत आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अरविंद पाटील असून त्यांनी संस्थेचा कारभार सुधारावा तसेच अधिकाऱ्यांवर वचक ठेवावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.