खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे नदी नाल्यांना पाणी मुबलक पाणी मिळते. मात्र यावर्षी कुठेच पाऊस न झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मान्सून आणखीन लांबणीवर पडल्यास दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. कृषी खात्याने पिकांचा सर्वे करून फोटो पाठविण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारचे फार्मर ॲप डाऊनलोड करून आपल्या शेताचे फोटो या ॲपवर अपलोड करावेत अन्यथा पीक संरक्षण विमा मिळणार नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारचे फार्मर तातडीने डाउनलोड करून फोटो अपलोड करावेत असे आवाहन कृषी खात्याचे तालुका निर्वाहक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी केले आहे.
दरवर्षी तालुक्यात वळीवाचा पाऊस मुबलक प्रमाणात होतो. मात्र यावर्षी वळीवाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. मे अखेरीस एक-दोन वेळा वळीवाची हजेरी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीने मशागत करून पेरणी केलेली आहे. मात्र वेळेत पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र खानापूर तालुक्यात गेल्या चार दिवसात पूर्ण पावसाच्या सरी झाल्यामुळे भात पिकाला जीवदान मिळाले आहे. मात्र पुन्हा पावसाने दडी दिल्यामुळे भात पीक वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खानापूर तालुक्यात पाऊस नसल्यामुळे सर्वच नदी, नाले कोरडे पडले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांची भटकंती होत आहे. येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस पडण्याची गरज आहे. खानापूर तालुक्यातील नदी, नाले प्रवाहित होण्यासाठी जांबोटी, कणकुंबी भागात दमदार पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. किमान आठ ते दहा दिवस सतत मुसळधार पाऊस पडला तर मलप्रभा नदीसह इतर नद्या दुथडी भरून वाहू लागते. तालुक्यातील शेतकरी तसेच सामान्य जनता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या दोन-चार दिवसात दमदार मोठ्या पावसाची गरज आहे. अन्यथा खानापूर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.