खानापुरात मराठी प्रेरणा मंचच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार
जांबोटी : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता ध्येय गाठण्यासाठी झपाटून अभ्यास करावा. सुरुवातीपासून विषय समजावून घेऊन आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती न वाटता परीक्षा एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी वाटेल, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी केले.
ते मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्यावतीने ताराराणी हायस्कूल खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहावी परीक्षेतील गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव हे होते.
प्रारंभी डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी आर. के. पाटील, अशोक चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवाजी हसनेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉक्टर प्रा. गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीचे फोटोचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत मराठी माध्यमात खानापूर तालुक्यात प्रथम आलेली संचिता शरद पाटील, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या श्रीनाथ वसंत सावंत व यांच्यासह पहिले सात क्रमांक मिळवलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉक्टर प्रा. गोपाळ पाटील, सदानंद पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ताराराणी हायस्कूलला महात्मा फुले आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शंभर टक्के निकाल लावणाऱ्या हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सदानंद पाटील, प्रा. डॉक्टर गोपाळ पाटील, पत्रकार वासुदेव चौगुले तसेच मुख्याध्यापक राहुल जाधव यांची गुणीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश पाटील, शिवाजी हसनेकर, संजीव वाटूपकर, सुनील चिगुळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. आर. पाटील व आभार मराठी प्रेरणा मंचचे सचिव अरुण कदम यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta