खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावापासून बारा किलोमीटरवर असलेल्या वरकड गावाजवळील पूल नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. पूल कोसळल्यामुळे बस बंद झाली आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मागील वर्षी तात्पुरती डागडुजी झाली होती पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. वर्षभरातच हा पूल कोसळलेला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिमेस वसलेली अतिदुर्गम भागात असलेली ही गावे विकासापासून नेहमीच वंचित आहेत. वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करत जीव मुठीत घेऊन या लोकांना शहरात यावे लागते. खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम खेडी ही विकासापासून व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेली आहेत. लोंढ्यापासून 12 किलोमीटर रस्त्याच्या अंतरावर येणारी गावे म्हणजे वरकड, गवळीवाडा, पाट्ये, दूधवाल, हनबरवाडा या गावांना प्रामुख्याने रस्त्याची गरज आहे. पश्चिम भागातील या वस्तीवाड्यांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.