स्वच्छता कामगारांसह कर्मचारी वर्गाकडून नगरपंचायतींच्या समोर धरणे
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार मिळत नाही. मात्र शहर स्वच्छतेसाठी दररोज वेठीस धरले जाते. यासाठी चीफऑफिसर आर. के. वटारे यांनी वेळेत पगार काढावा, अशी मागणी नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारांनी केली. मात्र काही कामगारांचे दोन महिन्याचे, काही कामगारांचे चार महिन्याचे, काही कामगारांचे तीन महिन्याचे पगार काढण्यात आले नाही. त्यामुळे कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्रासाला कंटाळून नगरपंचायतींचे प्रभारी अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची गुरूवारी भेट घेऊन तक्रार केली. लागलीच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी चीफऑफिसर आर. के. वटारे यांना लागलीच पगार काढण्याचे आदेश देऊन कडक शब्दात खरडपट्टी केली. मात्र नगरपंचायतींच्या कार्यालयात चीफऑफिसर आर. के. वटारे यांनी तहसीलदार पगार काढणार की मी पगार काढणार असे बोलत खुर्ची कामगारांच्या आगावर उचलली व संघटनेचा अध्यक्ष शानुर गुडलार याच्यावर धावून आले.
त्यामुळे स्वच्छता कामगारांसह कर्मचारी वर्गाने नगरपंचायतींच्या समोर धरणे सत्याग्रह करत चीफऑफिसरची हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.