
खानापूर : खानापूर तालुक्यातील बेकवाड येथे शेतवडीतील बोअरवेल सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर चांगप्पा माळवी (वय 34) राहणार झुंजवाड असे आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर माळवी हे आपल्या शेतात मिरची लागवड करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातील बोअरवेल जवळ जाऊन बोअरवेल सुरू का होत नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात मिरची लागवडीचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच हेस्कॉमचे कार्यकारी अधिकारी कल्पना तिरवीर, नंदगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक अधिकारी तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. मृत शेतकरी ज्ञानेश्वर माळवी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. ज्ञानेश्वर यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta