
बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व राखण्यासाठी सीमाभागातील मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढण्याची भूमिका घ्यावी अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे.
खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची भेट घेतली. तसेच सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती देत गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात कन्नडची सक्ती मोठ्या प्रमाणात वाढवली जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना विविध प्रकारच्या दडपशाहीचा सामना करावा लागत असून पुन्हा एकदा कन्नड सक्ती विरोधात लढण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच समितीची ताकत वाढविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे सीमा भागातील मराठी जनतेला पाठींबा आणि मार्गदर्शन करावे अशी मागणी केली.
यावेळी पवार यांनी सीमा भागातील परिस्थितीची जाणीव आहे तसेच समितीच्या नेत्यांकडून विविध प्रकारची माहिती दिली जाते. सीमा लढ्याचा एक भाग म्हणून आणि मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीने निवडणुका लढवण्याची भूमिका घ्यावी यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी माहिती दिली. माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील समितीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला त्याला सहकार्य करून उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जाते असे सांगितले.
यावेळी खानापूर तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मुकुंद पाटील, गुरूराज देसाई आदी उपस्थित होते.
लढल तरच टिकाल : शरद पवार
अस्तित्वाचं प्रश्न निर्माण झाला असून समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही. लढल तरच टिकाल नाही तर संपून जाल, असे प्रोत्साहन पर उद्गार पवार साहेबांनी काढले आणि महाराष्ट्र समितीच्या आणि मराठी माणसांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.
Belgaum Varta Belgaum Varta