खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. खानापूरचे सभासद वाय. एम. पाटील व नंदू कुंभार यांचे यांचे सभासदत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सोसायटीच्या नियमाला धरून आहे. त्यामुळे सोसायटीची बदनामी करणाऱ्या कोणत्याही सभासदाची हयगय केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन सोसायटीच्या अध्यक्षाना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २५ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाने केलेली कारवाई ही संस्थेच्या नियमाला धरून आहे. त्यामध्ये सत्तेचा गैरवापर कुठेच झालेला दिसत नाही. त्यासाठी संस्थेविरोधात कुणीही अपप्रचार किंवा वेठीस धरण्याचे प्रकार होत असतील तर अशा सभासदांवर कारवाई होणे गरजेचं आहे आणि अशाप्रसंगी जर कुणी कायदा आणि सुरक्षा बिघडवण्याच्या दृष्टीने जर कुणी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी.
याआधीही 11 सभासदांना नोटीसा देवून 6 लोकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते. तेव्हा तो खरंतर सत्तेचा गैरवापर होता. त्यावेळेला तेही शिक्षक-सभासदच होते. त्यावेळेला वाय.एम्. पाटीलांना समोरच्यांचं म्हणणं का ऐकलं नाही? कारण एकंच ते म्हणजे वाय. एम. पाटलांची मुजोरगिरीच होती. त्यांना खरंच सोसायटीची काळजी असती तर त्यांनी समस्या सोडविण्यावर भर दिला असता. पण त्यांनी तसे न करता सोसायटीत गोंधळ माजवून सभासदांमध्ये सोसायटीची बदनामी करून, व्हाट्सएपगिरी केली. त्यामध्ये त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत.
शिवाय सोसायटीतील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहता नंदू कुंभार या शिक्षकांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला कार्यालयात जावून मारलेलं आहे. जर त्यांच्यावर अन्याय झालेला होता तर त्यांनी रितसर तक्रार करावयाची होती. ते सोडून त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय वृतपत्रातून सोसायटीबाबत आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर छापून सोसायटीची बदनामी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर केलेली कारवाईही सोसायटीच्या नियमांला (55/36) धरून आहे. त्यामुळे जर कुणी सोसायटीच्या कायदा व सुव्यवस्थेत अडथळा आणत असतील तर त्यांच्या वर योग्य ती कारवाई यापुढेही करण्यात यावी, असे आम्ही याव्दारे संचालक मंडळाला निवेदनाद्वारे सूचना केलेली आहे
तसेच वाय. एम. पाटील व नंदू कुंभार यांचे रद्द केलेले सभासदत्व योग्य असून त्याबद्दल कोणताही फेरविचार करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संतापही सभासद-शिक्षकांनी व्यक्त केला. याप्रसंगी मागील संचालक मंडळाने निलंबित केलेले सभासद रमेश मादार, एस. टी. मेलगे व महेश हेब्बाळकर, प्रभाकर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच यावेळी बाळू चापगावकर, जे. पी. पाटील, रमेश कवळेकर, एस्. टी. पाटील, आय. बी. वस्त्रद, व्ही. एम. पाटील, शिवाजी गावडे, प्रताप मुरगोड, बी. बी. मुरगोड, ए. आर. भोसले, यल्लाप्पा कोलकार, लक्ष्मण गुरव, भैरूजी पाटील, एम. एन. पाटील, बापू दळवी, नागाप्पा सुतार, महेश कुंभार, दत्ताजी सोनारवाडकर, सुर्याजी पाटील, सुरेश मादार, प्रकाश मादार, जोतिबा घाडी तसेच महिला सदस्यांपैकी ए. ए. फर्नांडीस, जे. बी. होसूर,श्रीदेवी बोम्मण्णावर, आर. एन. देशपाईक, व्ही. एस. कदम, एस्. पी. काटगाळकर, ए. डी. चोपडे, सीमा मुल्ला, वैशाली पाटील याबरोबरंच असे अनेक सभासद यावेळी उपस्थित होते.