केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी
बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार असून येत्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौर्यावर येणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती युवकांच्या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी बेळगाव खानापूर सीमाभागातील महामार्गावरील फलक कन्नडसह मराठी भाषेत लावावेत असे साकडे शिष्टमंडळाने त्यांना घातले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे आज गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळाने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला आणि काळे फासण्याचा प्रकार तसेच सीमाभागात मराठी भाषिकांची होत असलेली दडपशाही याबाबत मंत्री गडकरी यांना माहिती दिली.
शिष्टमंडळातील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मी स्वत: खुद्द येत्या जानेवारी बेळगाव दौर्यावर येणार आहे असे सांगितले. तसेच हलगा-मच्छे बायपासचा जो तिढा निर्माण झाला आहे. त्या प्रकरणी आपण स्वत: जातीने लक्ष घालणार आहे. त्यावेळी स्थानिकांनी आपली बाजू व तक्रारी मांडाव्यात. आपण शेतकर्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही हे नक्की, असे आश्वासनही त्यांनी दिले.
बेळगाव, खानापूर ते अनमोड पर्यंतच्या महामार्गासंदर्भात खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी यावेळी तक्रार मांडताना सदर रस्त्यावरील फलक कानडीसह मराठीतही लावले जावेत, अशी मागणी केली. त्यावर संबंधित मार्गावरील फलक मराठीत लावण्याबरोबरच या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष पियुष हावळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे , युवराज काकडे, अॅड. धनंजय मदवना, अॅड. सुहास कदम आदी उपस्थित होते.