खानापूर : शिक्षकानी विद्यार्थ्याना पुस्तकी ज्ञान देण्या अगोदर विद्यार्थ्याचा चेहरा वाचता आला पाहिजे. कारण समाजात शिक्षकाला वेगळं स्थान आहे. तेव्हा विद्यार्थी घडविताना विद्यार्थ्याच्या परिस्थितीची जाणीव करून आदर्श विद्यार्थी घडविले तर विद्यार्थ्यात शिक्षक आदर्श राहतो. याच शिक्षकाना आदर्श शिक्षक म्हणतात. ऐवढेच नव्हे तर सेवा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्याच्या नजरेत आदर्श शिक्षकच दिसला पाहिजे. अशा गुणी शिक्षकाचा सन्मान करणे हे कर्तव्य समजुन खानापूर म. ए. समितीच्या वतीने तालुक्यातील तालुका, जिल्हा आदर्श शिक्षकांचा तसेच तालुका आदर्श शाळाचा सन्मान केला. याचा मला अभिमान वाटला असे विचार मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस व माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी रविवारी शिवस्मारकात आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
व्यासपीठावर माजी आमदार म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सीमासत्याग्रही शंकर पाटील निडगल, माजी सभापती मारूती परमेकर उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले व स्वागत आबासाहेब दळवी यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील एम. एम. देवकरी मणतुर्गा शाळा, डी. एम. देसाई गुंडपी शाळा, भुजंग गावडे गवळीवाडा शाळा व सौ. संध्या बेनचेकर कन्या विद्यालय नंदगड यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त झाल्याने तसेच तालुका आदर्श शिक्षक टी. आर. गुरव (कसबा नंदगड), सौ. एम आर. पाटील (मोदेकोप), व्ही एफ सावंत (खानापूर), तसेच तालुका आदर्श शाळा पुरस्कार मिळालेल्या शाळ उच्च प्राथमिक मराठी शाळा कुप्पटगिरी, उच्च प्राथमिक मराठी शाळा अबनाळी, उच्च प्राथमिक मराठी शाळा चिखले, उच्च प्राथमिक मराठी शाळा किरावळे आदीचा पाहुण्याच्या हस्ते शाल, मानचिन्ह, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, पांडुरंग सावंत, मारुती परमेकर आदीनी विचार व्यक्त केले. तर सत्कारमुर्तीनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले तर आभार रमेश धबाले यांनी मानले.