17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी 2 वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत म. ए. समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात खानापूर तालुक्यातील ईटगी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी खानापूर तालुक्याच्या आमदार सौ. अंजलीताई निंबाळकर यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून तालुक्यातील मराठी भाषिकांचा अवमान केला आहे. आणि तश्या प्रकारचे चित्रफीत पसरत आहे, मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येऊन मराठी भाषिकांच्या विरोधात अवमानकारक शब्द उच्चारून राजद्रोहाचा गुन्ह्याला खात पाणी घालणार्या आमदार सौ. अंजलीताई निंबाळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच कारवार मतदारसंघाचे खासदार श्री. अनंतकुमार हेगडे यांना खानापूर तालुक्यातून 5 वेळा भरगोस मतदान करून निवडून आणले आहे त्यांनी देखील मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाविरुद्ध एक अवाक्षरही काढले नाही त्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला.
खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये दुफळी पडून दोन गट कार्यरत आहेत. दोन्ही गटांमध्ये एकोपा करण्यासाठी प्रयत्न चालू असताना म. ए. समितीच्या नावाखाली निवडून आलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांनी एकी होऊ नये यासाठी धमकी सत्र चालू केले आहे. त्यांचाही सभेने निषेध केला. म्हणून मराठी भाषिक जनतेने एकसंघ राहून मराठी भाषिकांच्या पाठीत खंजीर खूपसणार्यांपासून सावध रहावे. येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा स्मारक स्टेशन रोड खानापूर येथे सकाळी ठीक 8.30 वाजता म. ए. समितीच्या दोन्ही गटांनी उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे.
या सभेच्या वेळी माजी नगरसेवक श्री. अनिल पाटील, माजी जि. पं. सदस्य श्री. विलास बेळगावकर, श्री. प्रकाश चव्हाण, श्री. विवेक गिरी, कार्याध्यक्ष श्री. यशवंत बिर्जे, श्री. मुरलीधर पाटील, श्री. अविनाश पाटील, श्री. विशाल पाटील, श्री. पुंडलिकराव चव्हाण, श्री. रुक्माना झुंंजवाडकर, श्री. विठ्ठल गुरव, श्री. शंकर गावडा, श्री. कृष्णा कुंभार, श्री. डी. एम. गुरव इत्यादींनी निषेधात्मक विचार व्यक्त केले. शेवटी श्री. महादेव घाडी यांनी आभार मानले.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …