खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी करण्यासाठी खानापूर तालुका युवा समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. समिती नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे संघटना विस्कळीत झाली होती त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होत आहे. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दोन्ही गट एकत्र येत आहेत. त्यामुळे सीमालढ्याला अजून बळकटी येईल, असे मत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना धनंजय पाटील म्हणाले, 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त निषेध सभा एकत्रितपणे घ्यावी असे आवाहन समिती नेतेमंडळींना केले होते. काही कारणांनी या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही जागरूक कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. 17 जानेवारी हुतात्मा दिनी एकत्रितरित्या अभिवादन करण्याचा दोन्ही समित्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. समिती संघटनेत कायमस्वरूपी एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. केवळ हुतात्मा दिनाच्या अभिवादन पुरता ही एकी मर्यादित न राहता ती शाश्वत आणि कायमस्वरुपी रहावी. यासाठी नेतेमंडळींनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
बैठकीला सदानंद पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, रणजीत पाटील, किरण पाटील, भुपाल पाटील, अनंत झुंजवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, विनायक सावंत, राजू कुंभार आदी उपस्थित होते.
